रायगड महायुतीमधील मतभेद उघड, भाजपच्या खासदार – आमदारांची लाडक्या बहिण कार्यक्रमाकडे पाठ
अलिबाग : रायगड जिल्ह्यात लाडकी बहिण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने महायुती मधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. जिल्ह्यातील भाजपच्या आमदार आणि खासदारांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात झालेल्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांमधील धुसफूस पुनश्च चर्चेत आले. रोहा नगर परिषदेच्या वतीने कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याचा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर भाजप खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव नसल्याने, भाजप कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मुख्याधिकाऱ्यांना जाबही विचारला. यानंतर नगर परिषदेनी नविन पत्रिका छापून चूक दुरुस्त केली. मात्र वागणूकीनंतर या सोहळ्याला खासदार धैर्यशील पाटील यांनी जाणे टाळले.बुधवारी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात रायगड जिल्ह्याचा लाडकी बहिण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. या सोहळ्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन मतदारसंघात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवर खासदार धैर्यशील पाटील यांचा फोटा लावण्यात आला नसल्याबाबत भाजपच्या रोहा तालुका कमिटीने नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन भाजपच्या तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. यानंतर माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे पार पडलेल्या या सोहळ्याकडे जिल्ह्यातील भाजपचे आमदारांनी तसेच राज्यसभा खासदारांनी या सोहळ्यापासून दूर राहणेच पसंत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला येणार नसल्याचे समजताच पक्षाचे पदाधिकारीही कार्यक्रमस्थळी फिरकले नाहीत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पेणचे आमदार रविंद्र पाटील, उरणचे आमदार महेश बालदी आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी लाडकी बहिण वचनपूर्ती सोहळ्याला येणे टाळले. दरम्यान खासदार धैर्यशील पाटील यांनी निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सर्व आमदार आपआपल्या मतदारसंघातील कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसतील. मी देखील पक्षाच्या कामात असल्याने या सोहळ्याला येऊ शकलो नसल्याचे खासदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात असूनही कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी या कार्यक्रमाला उपस्थित राहीले नाही. कर्जत विधानसभेच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या ताब्यातील कर्जत मतदारसंघ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. त्यामुळे थोरवे यांनी या सोहळ्यास येणे टाळले, तर महेंद्र दळवी का अनुपस्थित राहीले हे स्पष्ट होऊ शकले नाही.