गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्मा हिरवे गुरुजी यांची १०४ वी जयंती साजरी
पनवेल-गोवा मुक्ती संग्रामात वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी शहीद झाले होते. पनवेलचे सुपुत्र, स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा हिरवे गुरुजी यांचा जन्म २१ जून १९१८ रोजी रोहा तालुक्यातील गारभट-चिंचवली या गावी झाला होता. दिनांक २१ जून रोजी गुरुजींची १०४ वी जयंती होती. पनवेल महानगर पालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालयात सदर विद्यालय आणि स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना, पनवेल यांच्या वतीने गुरुजींची १०४ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत गाऊन उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुजित म्हात्रे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविक भाषणा मध्ये म्हात्रे सरांनी सांगितले की, मागच्या वर्षी शाळेत १२० विद्यार्थी शिकत होते आणि या वर्षी आजपर्यंत नवीन ४० विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे म्हणजे आज रोजी या विद्यालयात १६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हु. हिरवे गुरुजी यांची प्रतिमा आणि सरस्वती मातेची मूर्ती यांचे पूजन करून उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे पदाधिकारी श्री. जगनाडे यांनी हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालया बाबत असणारा इतिहास तसेच गुरुजीं बद्दलच्या काही आठवणी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितल्या. हु. हिरवे गुरुजींच्या मोठ्या सुनबाई श्रीमती अरुणा हिरवे यांनी शालेय जीवनावरील एक सुंदर अशी कविता गाऊन उपस्थित शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांना मंत्रमुग्ध केले. पुढे गुरुजींचे नातू श्री. नागेश हिरवे यांनी गुरुजींच्या जन्मापासून शहीद होण्यापर्यंतचा इतिहास थोडक्यात मांडला. त्यानंतर शाळेतील विविध वर्गातील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले आणि शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना, पनवेलचे सदस्य यांचा सहभाग लाभला.